Wednesday, September 15, 2010

पहिले चुंबन

पहिले चुंबन

अधीरतेने आज गायिले, थरथरणार्‍या अधरद्वयाने
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने

सर्वांगी मोहरला काटा, गात्री गात्री गोड शहारे
घुसमटलेल्या श्वासांमधुनी, सतार मनि झिनि झिनि झंकारे

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले

....... उल्हास भिडे (१५-९-२०१०)

Friday, September 10, 2010

जीवन सामान्याचे

जीवन सामान्याचे

अर्थहीन हे भासे मजला जीवन सामान्याचे
मनात काहुर काय प्रयोजन माझ्या अस्तित्वाचे

या असल्या वांझोट्या चिंता मेंदू कुरतडती
विचारांति त्या फोलच ठरती बघता अवती भवती

अगणित नगण्य अणु रेणू हे विश्वाचा आधार
पेशी पेशी मिळून देती जीवाला आकार

संगणकाचे Bit अन् Byte महाजाल निर्मिती
Mega Giga Tera Peta, Byteमधून फुलती

समान्यांतुन समाज घडतो असामान्य जाणिती
सामान्यां सन्मान्य मानुनी जीवन वेचीती

गोवर्धन उचलला हरीने सामान्यांसाठी
स्वराज्य तोरण शिवे बांधिले सामान्यांसाठी

क्रांतिवीर बलिवेदी चढले सामान्यांसाठी
सीमेवरती खडा पहारा सामान्यांसाठी

कलावंतही रसिकजनांना माय-बाप मानिती
भगवंताची भूक असे रे भक्तांची भक्ती

कळस राउळी सोन्याचा परि पाया पाषाणाचा
अदृश्य अशा आदेशे निश्चित हेतू अस्तित्वाचा

सामान्यांचे महत्त्व जगती सामान्यें जाणावे
सामान्य म्हणूनी कधी स्वत:ला उगा न हिणवावे

आयुष्या वरदान मानुनी जीवन घडवावे
कविश्रेष्ठांसम “जगण्यावरती शतदा प्रेम करावे”

...... उल्हास भिडे (१०-९-२०१०)

Friday, September 3, 2010

मी काय म्हणू ?

मी काय म्हणू ?

गोकुळाष्टमीच्या हंड्या फुटल्या ....

आता नव्या उत्सवाची धामधूम सुरू होणार

कुणी श्रद्धेनं, कुणी जबाबदारी म्हणून,

तर कुणी अंगात उत्सवाच वारं संचार म्हणून...

सगळेच जोरदार तयारीला लागणार

............................................................................

मी देखील,

तुमच्यावरच्या प्रेमानं, सवयीनं

आणि आश्वासनं पाळायची खोड असल्यानं

ठरल्या दिवशी हजर होणार

विघ्नहर्त्यासाठी Z secutity !!! या विरोधाभासाने खिन्न होणार

पेपरात माझे फोटो झळकणार

मूर्ती, रोषणाई, उधळपट्टी यावर चर्चा रंगणार

News Channel वाले मला celebrity बनवणार

…………………………………………………..

भटजींच मोबाईलकडे आणि

यजमानांच आरत्या उरकण्याकडेच जास्त लक्ष असणार

भक्तीभाव अभावानेच आढळणार

बाजारभाव मात्र भडकणार

दाम दुप्पट किंमतीच्या दुर्वा, फुलं मला टोचत राहणार

एखाद फूल पडल तर .

कौल दिला अशी अंधश्रद्धा बोकाळायला नको

याच केवळ चिंतेने, मी दुर्वा-फुलांचा भार वाहणार ..

या वर्षी माझा उंदीरही,

ऑक्टोपस आणि मगरीनंतर

त्याचा नंबर लागेल की काय या tension मध्ये असणार

……………………………………………….

मंडपात गर्दी उसळणार

बहुतेक सगळे मागायलाच येणार

देणारा कोणी येतोय का, याची मी वाट पाहणार

रोषणाईच्या झगमगाटात आशेचा किरण शोधणार

समाजात मला शोधणार्‍याचा शोध घेत, माझी नजर भिरभिरणार

चुकून तसा दिसला कोणी,

तर त्याच्या दर्शनाने मी सुखावणार

………………………………………………

नाहीतर एकूण, आनंदी आनंदच असणार

भक्तांच्या अपराधांनी फुगलेल्या पोटात मोदकाला जागा नसणार

म्हणून मोदक तसाच हातात धरून ठेवणार

आणि "आता पुरे" म्हणून सांगण्यासाठी उजवा हात उचललणार .

तर..... तुम्ही त्याला वर किंवा आशिर्वाद समजणार

कर्म माझं अस म्हणून

तोच हात कपाळावर मारून घ्यावासा वाटणार

……………………………………………………………

इतक्यात ……

खांबावरच्या फोटोतल्या, त्या पुणेरी पगडी शी नजरानजर होणार

सत्तांधांचा थरकाप उडविणारी त्याची जहाल नजर

नैराश्याने मवाळ झाल्यासारखी भासणार ..

"काय रे देवा ...." सद्गद स्वरात तो म्हणणार,

"कुठल्या मिशाने हे सुरू केलं मी .

आणि आता,

केवळ उत्सवाचा उत्साह,

इतकच आमीष उरलय ?

हे सारं कधी बदलणार ?

की असंच सुरू राहणार ?

..... काय रे देवा ..... "

मी तरी यावर काय बोलणार ?

दरवर्षी सारखच, थातुर मातूर उत्तर देणार .

बाळा, लोकांना हेच जर मान्य असेल

तर आपण तरी काय करणार ?

माणूस होतास म्हणून,

काय रे देवा

अस तरी म्हणू शकतोस …….

……. मी काय म्हणू ???.......???

--------- उल्हास रामचंद्र भिडे (३-९-२०१०)