Friday, October 29, 2010

अशी दिवाळी येइल का ?

अशी दिवाळी येइल का ?

दीप उजळले दारोदारी मने मात्र बुडली अंधारी
तिमिरहारिणी तेजदायिनी अशी दिवाळी येइल का ?

मनामनातुन दीप उजळती विश्वासाचे सौहार्दाचे
वैविध्यातुन एकत्वाचे स्वप्न खरे ते होइल का ?

स्वार्थ, विकारां मात देउनी भ्रष्ट-राक्षसा खडे चारुनी
समाजपुरुषा जागविण्याचे, पडघम कानी पडतिल का ?

रंगांतुन संगती साधुनी, एकत्वाच्या कुंचल्यातुनी
रांगोळीसम मंगलमय ते चित्र कुणितरी रेखिल का ?

अशी दिवाळी खरीच यावी, याची डोळां मला दिसावी
परमेशा ही आस मनीची, सांग पुरी तू करशिल का ?

..... उल्हास भिडे (३०-१०-२०१०)

Monday, October 25, 2010

विटंबना

विटंबना

अचानक एक दिवस,
कोणीतरी उठतो,
कुठल्याशा पुतळ्याची,
विटंबना करून जातो …..
..... गदारोळ उठतो ……
मग सुरू होतात,
समर्थक आणि विरोधकांमध्ये
हाणामार्‍या…..
उसळतात दंगली….
आणि नकळतच होते
आपसातल्या सौहार्दाचीच विटंबना
पुतळा,
निश्चल, निर्विकार
की खिन्न आणि असहाय्य ???
………..
विटंबना करणारा मात्र,
मजेत असतो,
शांतपणे दुरून गंमत पहात …….
कदाचित,
पुढच्या अशाच एखाद्या कार्यक्रमाचं planning करत.

...... उल्हास भिडे (२०-१०-२०१०)

Friday, October 8, 2010

साकडं

साकडं

काढून ठेवलेल्या चपलांबरोबर
विकारांची वस्त्र
तात्पुरती का होईना,
देवळाबाहेर उतरवून …..
तुझे भक्त
जेव्हा तुझ्या मूर्तीच्या दर्शनात
मग्न असतात,
तेव्हा .... हळूच देवळाबाहेर येऊन
गोकुळचा कान्हा होऊन
ने चोरून
ती सारी वस्त्रं
आणि कर अग्नीच्या हवाली….
…….मग बघ,
दिसू लागशील त्यांना तू
देवळात
आणि देवळाबाहेरही.
देवा ! .....
..... करशील का रे एवढं माझ्यासाठी ?

….. उल्हास भिडे (८-१०-२०१०)