Friday, December 9, 2011

कळले होते... कळले नव्हते

कळले होते... कळले नव्हते

ते भाव तुझ्या हृदयीचे, मी कधीच टिपले होते
चकवून तुझ्या डोळ्यांना नजरेतुन झरले होते

त्या अधीरल्या शब्दांना, ओठात रोखले होते
मिटलेल्या ओठांमधुनी, स्मितहास्य बोलले होते

त्या अवचित भेटीगाठी, की योगच जुळले होते
की योग तसे भेटींचे, जुळवून आणले होते

जणु ध्यास तुझा लागूनी, मन झपाटलेले होते
बेधुंद स्वप्न प्रेमाचे, वास्तवास पडले होते

अन् व्यक्त जाहलो तेव्हा, दोघांना कळले नव्हते
ते सुप्त भाव कोणाच्या शब्दांतुन फुलले होते

.... उल्हास भिडे (९-१२-२०११)

Wednesday, December 7, 2011

दाद

दाद

तिच्यावर लिहिलेली कविता वाचून
माझ्याकडे एकटक पहात
तिने हळूच भिरकावलेला
माझ्या कवितेचा कागद ......
..........
…..मी स्तंभित, संभ्रमित होण्याआधीच
माझ्या गळ्यात हात गुंफून
ऊष्ण श्वासातून तिने पुटपुटलेले
शब्द..... निरर्थक तरीही आशयघन....
.....मनातून स्फुरलेल्या कवितेला
मनात घुसणार्‍या कवितेतून दिलेली
दाद !

.... उल्हास भिडे (७-१२-२०११)

Tuesday, September 27, 2011

कधीच केला मी पोबारा

कधीच केला मी पोबारा

जा परतूनी जा माघारा
नका ठोठवू राउळ द्वारा
सोडुनी देव्हारा, गाभारा; कधीच केला मी पोबारा

दुर्मिळ झाली निर्मळ भक्ती
पाखंडी तर खंडोगणती
भक्त मनी निव्वळ आसक्ती
’मी’ पुढती ना कसली गणती
दांभिक भक्तापरीस वाटे, नास्तिक मजला प्यारा ..... १

उभारूनिया विशाल मांडव
उच्छादाचे चाले तांडव
उत्साहाच्या अतिरेकाने
उन्मादाचा होतो उद्भव
भंपक आर्जव बेगडी भक्ति, येउनि सार्‍याचा तिटकारा ..... २

नवस, साकडे नको जोगवा
नको भक्तिचा फुका गवगवा
मनामधे तुमच्याच डोकवा
तिथला माझा अंश जागवा
कर्मकांड अन पूजेआधी, मानव-धर्मा अंगीकारा ….. ३

उठा सुधारा आणि सावरा
डळमळणारा हा डोलारा
सुधारणे जर शक्य नसे तर
उपाय यावर एकच न्यारा
निरोप द्या मज कायमचा अन् असुरांची मंदिरे उभारा ….. ४

.... उल्हास भिडे (२७-९-२०११)

Sunday, September 25, 2011

६, ४, आणि मी

६, ४, आणि मी

पहिल्या ’ट्याहां’ पासून
आपल्या साथीला जुंपलेले
पाचवीला पुजलेले
ते सहा बेपर्वा….
आयुष्यभर आपल्याला चिकटलेले,
पायात पाय घालून पाडणारे….
…. कसेही असले ते तरी,
त्यांच्यासकटच गाठावे लागतात
ते चार टप्पे….
…..परिपूर्ण आयुष्य,
सर्वार्थाने जगण्यासाठी.
………………………………….
अंतिम टप्प्याचा निर्णय,
अंतिम श्वासानंतर……
..... चित्रगुप्ताच्या कॉंप्युटरमधल्या व्हायरसमुळे
जर Accidentally प्राप्त झाला तो अंतिम टप्पा;
तर ....... त्याच क्षणी लोटांगण घालून
विनवेन देवाला....
"नको देवा.... नकोय मला मुक्ती…..
तिथे नको पाठवू रे !.....
…..असेल तिथे निरामय आनंद
नसतीलही चिंता, क्लेश, दु:ख….
पण आहे का रे तिथे तो संघर्ष ?
आहे का तो थरार ?
एकट्यानेच सहांशी झुंजण्यातला
..... नाही ना ?
म्हणूनच देवा, कृपा कर
आणि पुन्हा एकदा,
आशा, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा, उत्कंठा
हा सारा गोतावळा सांभाळत
त्याच सहांशी जिकिरीचं युद्ध लढण्यासाठी,
त्यातलं नाट्य अनुभवण्यासाठी,
पुन्हा त्याच मनस्वी धडपडीसाठी,
देवा,
मला Recycle Bin मध्येच टाक कसा."

.... उल्हास भिडॆ (१८-६-२०११)

Monday, May 16, 2011

तर....

तर....

का, कसं ..… कुणास ठाऊक ?
आज आठवणींचं पाखरू
वळचणीतून मोकळ्यावर आलं….
आठवली….
ती नजरानजर,
चोरट्या कटाक्षातले ते भाव….
आठवल्या,
कधी सहज घडलेल्या भेटी
तर कधी, जुळवून आणलेले
भेटींचे योगायोग…..
कधी चुकून झालेला ओझरता स्पर्श….
अजुनही अंगावर गोड शहारा आणणारा…
"आपकी नजरोंने समझा प्यारके काबिल मुझे...."
..... संमेलनात तू गात असताना
मला मित्रानं मारलेली कोपरखळी,
तुझ्या नजरेने मिश्किलपणे हळूच टिपलेली….
सारं जाणून देखील,
तसेच राहिलो गं ….
अव्यक्त ....
मनातलं गूज
नाही आलं ओठावर
कंठातच शब्द थिजले, अवघडले
हृदयातच रुतून राहिले…..
………….
….आजच्यासारखी शब्दांची साथ
त्यावेळी मिळाली असती तर……
तर........
.... तर आज ही कविता जन्मलीच नसती.

.... उल्हास भिडे (१५-५-२०११)

Friday, April 1, 2011

"का ?"

"का ?"

"का ?" प्रश्नाचा किडा
कोणे एके काळी वळवळला
शेपूट गळलेल्या,
दोन पायावर चालणार्‍या
प्राण्याच्या डोक्यात….
काहूर माजवलं "का ?" ने,
"का ?" ने कावला तो….
शतकानुशतकं "का ?" शी झगडत,
"का ?" ची कास धरत,
असंख्य "का ?" चे दगड ओलांडत,
गेला विकासाचे नवनवे टप्पे गाठत…..
……………………
"का ?" च्या निराकार गुहेत
चाचपडताना गवसला ॐकार,
ठेचकाळताना उठलेल्या चीत्कारातून
घडला काव्याचा साक्षात्कार.
सापडले सप्त सूर
पालटला जीवनशैलीचा नूर…….
………………….
पण दुर्दैवाने,
विकासाच्या प्रदीर्घ प्रवासात
प्रगल्भ होणार्‍या बुद्धीबरोबरच,
मनात पोसत गेला
विकारांचा विखार…..
ऐहिकाचा चढता आलेख,
मानवी मूल्यांची घसरण…..
र्‍हासाप्रत, विनाशाप्रत नेणारी.
बुद्धीला अवकाशाचे वेध,
मनं विकारांच्या गर्तेत
अश्मयुगाकडे वाटचाल करणारी….
……………………………
स्वत:पलिकडच्या "का?" ची उत्तरं
खूप शोधली आजवर
पुढेही शोधायच्येत…. कल्पांतापर्यंत……
पण आता,
र्‍हासाच्या पाशातून आणि
काळाच्या कराल दाढेपासून वाचण्यासाठी
प्रकर्षाने शोधावी लागतील,
स्वत:तल्या "का?" ची उत्तरं …….
का घडलं असं ?
कुठून आलो ? कुठे चाललोय ?
काय होतो ? कसे झालोय ?
काय कमावलं ? किती गमावलं ?
का झालो आपण असे ?
का ? का ?

…… उल्हास भिडॆ (१९-२-२०११)

चित्र

Monday, February 7, 2011

उफराटा विचार

कविता अचानकच स्फुरते. कशी ते सांगता येत नाही.
सदर कविता मला मुक्तछंदात आणि छंदात एकाच वेळी सुचत गेली.
दोन्ही पद्धतीने लिहिली. यातला नेमका कुठला प्रकार इथे प्रकाशित करावा या संभ्रमात होतो. म्हणूनच ही कविता दोन्ही स्वरूपात प्रकाशित करतोय.
कवितेच्या नांवाप्रमाणे हे देखील उफराटंच.

उफराटा विचार (मुक्तछंद)

कुणाच्यातरी जखमेवरच्या खपल्या
कुणीतरी उचकटलेल्या.....
त्यातून वाहणारं,
शब्दांतून भळभळणारं रक्त
मिटक्या मारत चाखताना,
त्याच्या उरफाट्या यातनांचा
उफराट्या शब्दांतून आस्वाद घेताना,
त्याने भोगलेल्या भोगांचा
काव्यानंद उपभोगताना .......
कधीतरी उगीचच
अंतर्मुख होऊन विचार करतो.....
दु:खाचा आस्वाद कसा काय घेऊ शकतो ? …..
….. काव्यरसिक म्हणून ?
की परदु:ख शीतल म्हणून ?
की त्याच्याशी तद्रूप होतो म्हणून ?
की आपल्यापर्यंत प्रत्यक्ष दु:ख पोचलं नाही या आनंदाने ?
की याचीच चटक लागलेय म्हणून ???
….. स्वत:चं दु:ख चघळायला
इतकं गोड लागतं का कधी ?
……………………………
पण पुढच्याच क्षणी
अंगावर पडलेली पाल झटकावी तसा
झटकून टाकतो हा उफराटा विचार
आणि ……
सिगरेटचा कचकचीत दम मारून,
वाफाळलेल्या चहा बरोबर
किंवा फेसाळणार्‍या ग्लासाबरोबर
चाळू लागतो पुढची पानं…..
….. अशाच एखाद्या दर्दभर्‍या कवितेसाठी

-------------------------------------------------------------

उफराटा विचार (छंदबद्ध)

कुणाच्यातरी जखमांवरच्या खपल्या कोणी उचकटलेल्या
शब्द होउनी रक्त भळभळे ऐशा त्या कविता रचलेल्या

मिटक्या मारुन रक्त चाखतो काव्यानंदी रंगुन जातो
उरफाट्या यातना तयाच्या उफराट्या शब्दे अनुभवतो

भोग भोगले त्याने ते मी काव्यातुन उपभोगत असता
अंतर्मुख मी, मनात घोळे विचार भोळा की उफराटा

दु:खाचा आस्वाद घेतसे शीतल ते परदु:ख म्हणूनी ?
दु:खाचे दूरत्व जाणुनी की त्याशी तद्रूप होउनी ?

चटक लागुनी परदु:खाची काव्यानंदे मी हरखावे !!
शक्य असे का अपुल्या दु:खा, मधुर म्हणोनी मी चघळावे ?

विषण्ण क्षणभर मी थोडासा, अन् किंचितसा विचलित होतो
समजावूनी मीच स्वत:ला पुढच्याच क्षणी मी सावरतो

अंगावर पडल्या पालीगत विचार उफराटा झटकूनी
धूम्रशलाका शिलगावोनी मस्त एक झुरका मारूनी

कडक चहाचा घोट घेत वा, मदिरा पेला लावुनि ओठी
पुन्हा शोध घे पुढल्या पानीं दर्दभर्‍या नव कवितेसाठी

.... उल्हास भिडे (७-२-२०११)