Friday, April 1, 2011

"का ?"

"का ?"

"का ?" प्रश्नाचा किडा
कोणे एके काळी वळवळला
शेपूट गळलेल्या,
दोन पायावर चालणार्‍या
प्राण्याच्या डोक्यात….
काहूर माजवलं "का ?" ने,
"का ?" ने कावला तो….
शतकानुशतकं "का ?" शी झगडत,
"का ?" ची कास धरत,
असंख्य "का ?" चे दगड ओलांडत,
गेला विकासाचे नवनवे टप्पे गाठत…..
……………………
"का ?" च्या निराकार गुहेत
चाचपडताना गवसला ॐकार,
ठेचकाळताना उठलेल्या चीत्कारातून
घडला काव्याचा साक्षात्कार.
सापडले सप्त सूर
पालटला जीवनशैलीचा नूर…….
………………….
पण दुर्दैवाने,
विकासाच्या प्रदीर्घ प्रवासात
प्रगल्भ होणार्‍या बुद्धीबरोबरच,
मनात पोसत गेला
विकारांचा विखार…..
ऐहिकाचा चढता आलेख,
मानवी मूल्यांची घसरण…..
र्‍हासाप्रत, विनाशाप्रत नेणारी.
बुद्धीला अवकाशाचे वेध,
मनं विकारांच्या गर्तेत
अश्मयुगाकडे वाटचाल करणारी….
……………………………
स्वत:पलिकडच्या "का?" ची उत्तरं
खूप शोधली आजवर
पुढेही शोधायच्येत…. कल्पांतापर्यंत……
पण आता,
र्‍हासाच्या पाशातून आणि
काळाच्या कराल दाढेपासून वाचण्यासाठी
प्रकर्षाने शोधावी लागतील,
स्वत:तल्या "का?" ची उत्तरं …….
का घडलं असं ?
कुठून आलो ? कुठे चाललोय ?
काय होतो ? कसे झालोय ?
काय कमावलं ? किती गमावलं ?
का झालो आपण असे ?
का ? का ?

…… उल्हास भिडॆ (१९-२-२०११)

चित्र