कविता अचानकच स्फुरते. कशी ते सांगता येत नाही.
सदर कविता मला मुक्तछंदात आणि छंदात एकाच वेळी सुचत गेली.
दोन्ही पद्धतीने लिहिली. यातला नेमका कुठला प्रकार इथे प्रकाशित करावा या संभ्रमात होतो. म्हणूनच ही कविता दोन्ही स्वरूपात प्रकाशित करतोय.
कवितेच्या नांवाप्रमाणे हे देखील उफराटंच.
उफराटा विचार (मुक्तछंद)
कुणाच्यातरी जखमेवरच्या खपल्या
कुणीतरी उचकटलेल्या.....
त्यातून वाहणारं,
शब्दांतून भळभळणारं रक्त
मिटक्या मारत चाखताना,
त्याच्या उरफाट्या यातनांचा
उफराट्या शब्दांतून आस्वाद घेताना,
त्याने भोगलेल्या भोगांचा
काव्यानंद उपभोगताना .......
कधीतरी उगीचच
अंतर्मुख होऊन विचार करतो.....
दु:खाचा आस्वाद कसा काय घेऊ शकतो ? …..
….. काव्यरसिक म्हणून ?
की परदु:ख शीतल म्हणून ?
की त्याच्याशी तद्रूप होतो म्हणून ?
की आपल्यापर्यंत प्रत्यक्ष दु:ख पोचलं नाही या आनंदाने ?
की याचीच चटक लागलेय म्हणून ???
….. स्वत:चं दु:ख चघळायला
इतकं गोड लागतं का कधी ?
……………………………
पण पुढच्याच क्षणी
अंगावर पडलेली पाल झटकावी तसा
झटकून टाकतो हा उफराटा विचार
आणि ……
सिगरेटचा कचकचीत दम मारून,
वाफाळलेल्या चहा बरोबर
किंवा फेसाळणार्या ग्लासाबरोबर
चाळू लागतो पुढची पानं…..
….. अशाच एखाद्या दर्दभर्या कवितेसाठी
-------------------------------------------------------------
उफराटा विचार (छंदबद्ध)
कुणाच्यातरी जखमांवरच्या खपल्या कोणी उचकटलेल्या
शब्द होउनी रक्त भळभळे ऐशा त्या कविता रचलेल्या
मिटक्या मारुन रक्त चाखतो काव्यानंदी रंगुन जातो
उरफाट्या यातना तयाच्या उफराट्या शब्दे अनुभवतो
भोग भोगले त्याने ते मी काव्यातुन उपभोगत असता
अंतर्मुख मी, मनात घोळे विचार भोळा की उफराटा
दु:खाचा आस्वाद घेतसे शीतल ते परदु:ख म्हणूनी ?
दु:खाचे दूरत्व जाणुनी की त्याशी तद्रूप होउनी ?
चटक लागुनी परदु:खाची काव्यानंदे मी हरखावे !!
शक्य असे का अपुल्या दु:खा, मधुर म्हणोनी मी चघळावे ?
विषण्ण क्षणभर मी थोडासा, अन् किंचितसा विचलित होतो
समजावूनी मीच स्वत:ला पुढच्याच क्षणी मी सावरतो
अंगावर पडल्या पालीगत विचार उफराटा झटकूनी
धूम्रशलाका शिलगावोनी मस्त एक झुरका मारूनी
कडक चहाचा घोट घेत वा, मदिरा पेला लावुनि ओठी
पुन्हा शोध घे पुढल्या पानीं दर्दभर्या नव कवितेसाठी
.... उल्हास भिडे (७-२-२०११)
Monday, February 7, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
धन्यवाद विक्रांत.
ReplyDelete"आम्हाला नाही सुचत असं काही" >>>
काय विक्रांत .... तुझ्या ब्लॉगवर
एक से एक मस्त पोस्ट लिहितोस तू.
मस्त आहे कविता. काका, खरंच तुम्हाला हे कसं सुचतं?
ReplyDeleteकाका, माझी इथली कमेंट कुठे गेली? अजून अप्रूव्ह केली नाहीत का? :(
ReplyDeleteधन्यवाद कांचन
ReplyDelete----------------------------------
काही दिवस मी ऑन लाइन नव्हतो,
त्यामुळे कमेंट्स बघायच्या राहून गेल्या होत्या.