Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Saturday, February 16, 2013

.... लागले -- (टीकात्मक गझल)


.... लागले -- (टीकात्मक गझल)

मागतो ते दान आताशा पडाया लागले
वाटते हे भाग्य आता फळफळाया लागले

लागले मिसरे सुचाया काफिया मिळताक्षणी
आणि वेगे गझल-जाते घरघराया लागले

बहर ये जमिनीस या, मी बीज अस्सल पेरता
जीर्ण, वठले वृक्ष सारे उन्मळाया लागले

दाटला अंधार होता, या नभाच्या अंगणी
कोंबडा दे बांग माझा, फटफटाया लागले

साठ होता बुद्धि नाठी, अनुभवाने जाणले
मन्मनी तारुण्य आता मुसमुसाया लागले

कोण हा उल्हास ? याला भीड, मुर्वत ना जरा
कोण कुठले लोक येथे कडमडाया लागले

.... उल्हास भिडे (२३-१-२०१३)

हल्ली


हल्ली     (गझल)
 
कुण्या काळचा बुद्दू झालो हुषार हल्ली
“मीच बरोबर” ठाम सांगतो त्रिवार हल्ली

मी चिंचेच्या झाडासम तरि प्रस्थापित मी
नवोदितांच्या ठायी ठरलो ‘चिनार’ हल्ली

जरी पाडतो सुमार कविता रोज तरीही
कुणी न म्हणती तरी तयांना टुकार हल्ली

कोण सांगतो ? ’जमिनी’वरती गझल लिहावी
स्वच्छंदी मी, करे अंबरी विहार हल्ली

’उल्हास’ ’भिडे’ने साध्य होत ना कधीच काही
मुजोर वर्तन जगन्मान्य हा प्रकार हल्ली

वरील शेर काही विशिष्ट संदर्भाने लिहिले आहेत.
काहीसे टोमणेवजा आहेत. 


----------------------------------------------------------------
खालील शेर जनरल आहेत

विषाद वाटे दुर्मिळ झाली अस्सल बीजे
तणानेच भरलेले दिसते शिवार हल्ली

पाल चुकचुके मनी अशी का प्रतारणेची
ताजमहाला ! डळमळती का मिनार हल्ली

नुरली हिम्मत, पोकळ धमक्यांना घाबरतो
उगा भासती बोथट शस्त्रे दुधार हल्ली

गद्यप्रस्तुती प्रघात रुजला काव्यामध्ये
वृत्तबद्ध लिहिण्याला म्हणती सुमार हल्ली

सांभाळू मी कशास नखरे अलामतीचे
माझ्या मागे ही(S S S) रदिफांची कतार हल्ली

‘आई-बाबा’ इतिहासाची विदीर्ण पाने
घेइ मराठी शब्दसंपदा उधार हल्ली

भारतमाते शाप तुला हा काय मिळाला !
विचार रुजण्याआधी रुजतो विखार हल्ली

.... उल्हास भिडे (३-२-२०१३)

वेदना


वेदना 

एक होता काळ जेव्हा वेदना कुरवाळली
चोचले मी पुरवले अन् वेदना सोकावली

मुक्त करण्या वेदनेला सजवले काव्यातुनी
मुक्त ना आसक्त झाली मन्मनाला ग्रासुनी

वेदना-मुक्ती कधीही शक्य नाही ताडले
जू तिच्या मानेवरी मी जीवनाचे लादले

इष्ट आपत्तीप्रमाणे वेदनेला मानले
की म्हणू मी वेदनेला दावणीला बांधले

आज माझ्या वेदनेला मीच देतो वेदना
मी तिला बधतोच ना अन् ती मला बाधेच ना

.... उल्हास भिडे (३०-१-२०१३)


करंटा


करंटा     (गझल)

आले रडू तरीही रडता मला न आले
पूरात आसवांच्या बुडता मला न आले

खच्ची मनात हिम्मत रुजली कधीच नव्हती
हातात शस्त्र असुनी लढता मला न आले

होती अतीव इच्छा मीही फुलून यावे
माती सदोष होती रुजता मला न आले

झूला झुले सुखाचा घेऊन उंच झोके
उंची बघून भ्यालो झुलता मला न आले

घडला प्रमाद फिरुनी विश्वास टाकण्याचा
गत अनुभवामधूनी शिकता मला न आले

पोशीत नित्य आलो मी अंतरी निखारे
उन्मुक्त होउनीया जळता मला न आले

का मी असा करंटा ? माझे मला कळेना
घडवू शके न काही, घडता मला न आले

हे दैवदुर्विलासा ! झाली तुझीच फत्ते
गेली हयात सारी, जगता मला न आले

.... उल्हास भिडे (१-१०-२०१२)

दान


दान

विसरलीस मला !
दुखर्‍या मनाला
एकच समाधान....
विसरण्यासाठी का होईना,
कधीतरी स्मरणात होतो.

तण उपटावं
तसं दूर केलंस
तुझी मर्जी....
समाधान इतकंच,
की कधीतरी रुजलो होतो.

अपेक्षेने पुढे केलेल्या ओंजळीत
दिलंस
अनपेक्षित दान.....
भरभरून वाहणारं,
रितेपण.

.... उल्हास भिडे(२-७-२०१२)

वारी

वारी

जरी पंढरीची करी मी न वारी, तरी भेटशी तू मला श्रीहरी
तुझ्या दर्शनाची मला काय चिंता, तुझा वास माझ्या मनोमंदिरी

टिळा ना कपाळा कधी लावला मी, कधी घातली माळ नाही गळां
गमे मायभूमी मला पंढरी, मी समाजात पाही तुला विठ्ठला

तुझे भक्त लाखो तुला पूजताना, तुझी लक्ष रूपे मला पाहु दे
तुझ्या दर्शनाचा मिळो लाभ त्यांना, तुझा अंश त्यांच्या मनी जागु दे

सदा सर्व काही मिळाले अम्हाला, असे वेळ आता तुला द्यायची
तुझ्या पंढरीला पुन्हा उद्धराया, कटीबद्धतेने उभे राह्यची

.... उल्हास भिडे (३०-६-२०१२)
(आषाढी एकादशी निमित्ताने)

Friday, April 27, 2012

अखेर



अखेर
 
जाता जाता अखेरचा हा घोट पिऊनी घेतो
जर जमले तर मरण्याआधी थोडे जगून घेतो

फसवुन गेले फासे, हरलो आयुष्याची खेळी
एकच मदिरा जिने कधीही प्रतारणा ना केली

आयुष्याचा भार वाहिला मदिरेच्या साथीने
रखडत खुरडत वाट चाललो मरणाच्या ओढीने

प्रवास संपे, अंतिम रेषा दोन अंगुळे उरली
अन् जगण्याची आस अचानक उचंबळूनी आली

नको वाटले जगणे, जेव्हा जीवन हाती होते
उभा मृत्युच्या दारी आता, पाउल का अडखळते

विचित्र सारी स्थिती पाहुनी, मी माझ्यावर हसतो
पिऊन प्याला अखेरचा हा, थोडे जगून बघतो

.... उल्हास भिडे (२७-४-२०१२)

Friday, March 23, 2012

आनंद

आनंद

माणसाची जगण्याची तर्‍हाच तर्‍हेवाईक.
अत्यानंदाने अश्रू,
विनोदाला कारुण्याची झालर,
कारुण्याचा रसास्वाद,
दु:खाला सुखाची किनार …….
बरं असतं तर्‍हेवाईक जगणं;
आयुष्याचं ओझं हलकं करायला.......
म्हणूनच,
क्षणाक्षणाला होतोय
एक आगळा आनंद
क्षणाक्षणाने जीवन संपत चालल्याचा
क्षणाक्षणाला मृत्यू जवळ आल्याचा.

.... उल्हास भिडे (१९-३-२०१२)

Sunday, January 22, 2012

द्वैत

द्वैत

पानांच्या गर्दीतून वाट काढत
दाट सावलीखालच्या मउशार मातीवर उतरून
माझ्या अवतीभोवती विसावलेले उबदार कवडसे,
शेजारीच खळाळणार्‍या निरागस झर्‍यावर
सांडलेला सोनेरी वर्ख,
मधुनच एखाद्या रानफुलाला
‘भोज्जा’ करत बागडणारी गोड फुलपाखरं,
कुठल्याशा पक्ष्याने
प्रियेला घातलेली सु्रेल साद,
टेकड्यांच्या पिलावळीसहित
दूरवर ठाण मांडून बसलेले डोंगर,
मंद झुळुकेला लयीत दाद देणारं
माळावरचं हिरवंगार गवत,
स्वच्छ निळ्या आकाशात रेंगाळाणारा
एखाद-दुसराच चुकार ढग…...
…….. मोहक, सुंदर, विलोभनीय इ. शब्द
फिके पडावेत असं ते दृष्य,
विधात्याने रेखाटलेलं अप्रतीम चित्र.....

मंत्रमुग्ध होता होता वाटलं......
इथेच संपून जावं, माझ्यातलं 'मी'पण,
विलीन होऊन जावं या सगळ्यात,
साधलं जावं अद्वैत……….
पण…..पण, मी ’मी’च राहिलो नाही
तर वाटेल का या सार्‍याचं अप्रूप ?
उपभोगता येईल का हा अमूल्य आनंद ?.....
साखरेला चाखता येते का, स्वत:चीच गोडी !!
सुरेल गळ्याला लाभते का, रसिक कानांची तृप्ती !!!
……………
…… ह्म्म्म्म .....
अद्वैताच्या अंबरातून
द्वैताच्या जमिनीवर अलगद उतरत
एक छानसा आळस देत उठलो तिथून
नि घराच्या वाटेकडे परतताना
चार पावलांनंतर मागे वळून पाहिलं….
...... विधात्याचं ते निसर्गचित्रं
शतपटीने सुंदर भासलं.

.... उल्हास भिडे(२०-१-२०१२)







Friday, January 13, 2012

रिती

रिती

स्वच्छ, गुळगुळीत, चकचकीत
सुखी संसाराचा ताजमहाल…..
मनाच्या थडग्यावर बांधलेला.

गगनाला गवसणी घालण्याच्या धुंदीत
स्वत:लाच हरवून बसलेला तू
आणि
या विशाल खुराड्यात
’आपल्या दोघांची स्पेस’ शोधत,
मनाच्या भग्नावशेषात
दडपलेल्या अपेक्षांच्या वाघळांचे
नि:शब्द चीत्कार दडपत
घट्ट पाय रोवून
खुरटलेली मी……..

पूर्वीसारखी रुंजी नको घालूस
पण कधीतरी
वळचणीला ’गुटरगु’ करण्याची,
खुराड्याचं घरटं करण्याची
इच्छा
बुद्धीने ग्रासलेल्या तुझ्या मनात
कधी निर्माण होईल का ? …….
….. की मी असंच बसायचं,
पोकळ सुखाची वांझोटी अंडी उबवत !!

.... उल्हास भिडे (१३-१-२०१२)

Friday, December 9, 2011

कळले होते... कळले नव्हते

कळले होते... कळले नव्हते

ते भाव तुझ्या हृदयीचे, मी कधीच टिपले होते
चकवून तुझ्या डोळ्यांना नजरेतुन झरले होते

त्या अधीरल्या शब्दांना, ओठात रोखले होते
मिटलेल्या ओठांमधुनी, स्मितहास्य बोलले होते

त्या अवचित भेटीगाठी, की योगच जुळले होते
की योग तसे भेटींचे, जुळवून आणले होते

जणु ध्यास तुझा लागूनी, मन झपाटलेले होते
बेधुंद स्वप्न प्रेमाचे, वास्तवास पडले होते

अन् व्यक्त जाहलो तेव्हा, दोघांना कळले नव्हते
ते सुप्त भाव कोणाच्या शब्दांतुन फुलले होते

.... उल्हास भिडे (९-१२-२०११)

Wednesday, December 7, 2011

दाद

दाद

तिच्यावर लिहिलेली कविता वाचून
माझ्याकडे एकटक पहात
तिने हळूच भिरकावलेला
माझ्या कवितेचा कागद ......
..........
…..मी स्तंभित, संभ्रमित होण्याआधीच
माझ्या गळ्यात हात गुंफून
ऊष्ण श्वासातून तिने पुटपुटलेले
शब्द..... निरर्थक तरीही आशयघन....
.....मनातून स्फुरलेल्या कवितेला
मनात घुसणार्‍या कवितेतून दिलेली
दाद !

.... उल्हास भिडे (७-१२-२०११)