मी काय म्हणू ?
गोकुळाष्टमीच्या हंड्या फुटल्या ....
आता नव्या उत्सवाची धामधूम सुरू होणार
कुणी श्रद्धेनं, कुणी जबाबदारी म्हणून,
तर कुणी अंगात उत्सवाच वारं संचारल म्हणून...
सगळेच जोरदार तयारीला लागणार
............................................................................
मी देखील,
तुमच्यावरच्या प्रेमानं, सवयीनं
आणि आश्वासनं पाळायची खोड असल्यानं
ठरल्या दिवशी हजर होणार
विघ्नहर्त्यासाठी Z secutity !!! या विरोधाभासाने खिन्न होणार
पेपरात माझे फोटो झळकणार
मूर्ती, रोषणाई, उधळपट्टी यावर चर्चा रंगणार
News Channel वाले मला celebrity बनवणार
…………………………………………………..
भटजींच मोबाईलकडे आणि
यजमानांच आरत्या उरकण्याकडेच जास्त लक्ष असणार
भक्तीभाव अभावानेच आढळणार
बाजारभाव मात्र भडकणार
दाम दुप्पट किंमतीच्या दुर्वा, फुलं मला टोचत राहणार
एखाद फूल पडल तर ….
’कौल दिला’ अशी अंधश्रद्धा बोकाळायला नको
याच केवळ चिंतेने, मी दुर्वा-फुलांचा भार वाहणार …..
या वर्षी माझा उंदीरही,
ऑक्टोपस आणि मगरीनंतर
त्याचा नंबर लागेल की काय या tension मध्ये असणार
……………………………………………….
मंडपात गर्दी उसळणार
बहुतेक सगळे मागायलाच येणार
देणारा कोणी येतोय का, याची मी वाट पाहणार
रोषणाईच्या झगमगाटात आशेचा किरण शोधणार
समाजात मला शोधणार्याचा शोध घेत, माझी नजर भिरभिरणार
चुकून तसा दिसला कोणी,
तर त्याच्या दर्शनाने मी सुखावणार
………………………………………………
नाहीतर एकूण, आनंदी आनंदच असणार
भक्तांच्या अपराधांनी फुगलेल्या पोटात मोदकाला जागा नसणार
म्हणून मोदक तसाच हातात धरून ठेवणार
आणि "आता पुरे" म्हणून सांगण्यासाठी उजवा हात उचललणार ….
तर..... तुम्ही त्याला ‘वर’ किंवा ‘आशिर्वाद’ समजणार
“कर्म माझं” अस म्हणून
तोच हात कपाळावर मारून घ्यावासा वाटणार
……………………………………………………………
इतक्यात ……
खांबावरच्या फोटोतल्या, त्या ‘पुणेरी पगडी’ शी नजरानजर होणार
सत्तांधांचा थरकाप उडविणारी त्याची जहाल नजर
नैराश्याने मवाळ झाल्यासारखी भासणार …..
"काय रे देवा ...." सद्गद स्वरात तो म्हणणार,
"कुठल्या मिशाने हे सुरू केलं मी ….
आणि आता,
केवळ उत्सवाचा उत्साह,
इतकच आमीष उरलय ?
हे सारं कधी बदलणार ?
की असंच सुरू राहणार ?
..... काय रे देवा ..... "
मी तरी यावर काय बोलणार ?
दरवर्षी सारखच, थातुर मातूर उत्तर देणार ….
“बाळा, लोकांना हेच जर मान्य असेल
तर आपण तरी काय करणार ?
माणूस होतास म्हणून,
‘काय रे देवा’
अस तरी म्हणू शकतोस …….
……. मी काय म्हणू ???.......???

सध्याच्या या विकृत स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या व अशा इतरही उत्सवान्बद्दल सर्वसामान्यांला काय यातना होतात हे अगदी प्रभावीपणे यात आले आहे. सर्व प्रमुख वर्तमानपत्रातून हे जाहीर व्हायला पाहिजे. जी काही प्रमुख गणेशोत्सव मंडळे आहेत त्यांच्यापर्यंत तरी हे पोहोचायलाच पाहिजे. अशा तऱ्हेचे लिखाण वारंवार या प्रमुख व समाजमान्य मंडळांपुढे मांडले गेले पाहिजे. जेणेकरून समाजाच्या यातना कळून या मंडळींमध्ये काही काळाने का होईना फरक पडेल. अशी एक शक्यता वाटते.
ReplyDeleteदुसरी जबाबदारी समाजाचीही - आपणच ठरवून गर्दी केली नाही, कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला गेलो नाही - तर हे गणपती उत्सव साजरे होतीलच कसे ? आपण दर्शनाच्या मिषाने जाणार - मग गणपतीच्या पुढ्यात काहीतरी ठेवणार -त्यामुळे भाव वाढ - हे सगळे आपल्याकडेच येते. अजून एक महत्वाचे - याकाळात ध्वनी प्रदूषण व गुलालाने हवा प्रदूषण किती होते त्याला सीमाच नाही.
धन्यवाद शशांक
ReplyDeleteफार कळकळीने विचार व्यक्त केलेत तुम्ही.
खर आहे. बदल घडायला हवा. कधी कसा
घडेल ठाऊक नाही.
पण आपण दुर्दम्य आशावाद बाळगायचा.