Thursday, September 10, 2009

असूया

असूया
सदान् कदा पाहतो तुला, त्याला बिलगलेली
इतकी सलगी का ग त्याने, काय जादू केली ?
तो तुझ्या समीप, नि मी मात्र दूर
असे का ग होते, मनी उठते काहूर
साद त्याची ऐकायाला, किती तू अधीर
येता त्याची हाक कानी, धावशी सत्वर
त्याची हाक झेलायला, कधीच तू चुकत नाहीस
मी फोडला टाहो तरी, ढुंकुन देखील बघत नाहीस
तुझा स्पर्श संग त्याला, लाभे येता जाता
माझ्याच का नशिबी या, कोरडया कविता
तुझे गाल, तुझे ओठ, तुझं चुंबन
आम्ही स्वप्नातच अनुभवायच
त्या पठ्ठ्याने मात्र या सर्वावर
स्वामित्व गाजवायच ?

वार्‍याशी खेळणाऱ्या तुझ्या अवखळ बटा
मी दुरूनच पाहतो
त्याच वेळी तुझ्या कुंतलातून
तो वाकुल्या दाखवतो
गाली त्याच्या गाल घासून, कसलं हितगुज करतेस ?
लाडे लाडे बोलताना तू , मानाही वेळावतेस
जेव्हा तुझी नाजुक बोटं, त्याच्या सर्वांगी फिरतात
असूयेच्या लाखो मुंग्या, माझ्या मना डसतात
मी चिडतो, रागावतो, जळफ़ळतो
मत्सराने पेटून उठतो
काहीही करू शकत नाही
म्हणुन देवाला
विचारतो

काय देवा त्याच पुण्य ? त्याला झुकतं माप दिलस
माझ्या भाळी मात्र का हे, असल फुटकं नशीब लिहिलस
माणसाचा जन्म देऊन, का रे असल दुःख दिलस ?
देवा मला त्याच्यासारख, सांग mobile का नाही केलस ?

........ सांग mobile का नाही केलस ?

......... उल्हास भिडे (२६-८-२००९)


1 comment:

  1. hee ekdamach kalaatanee denaari shevatachee ol - ekdam jamoonach geliy. va va very nice idea - bhannat!!!!!!!!
    shashank

    ReplyDelete