Sunday, November 14, 2010

चिरंतन सत्य

चिरंतन सत्य

मर्तिकाच्या सामानाचं दुकान
सुतकी चेहर्‍याचं गिर्‍हाईक
दुकानदाराचा निर्विकार चेहरा,
सकाळीच बोहनी झाली म्हणून
पैसे घेताना खुलला
श्रद्धेनं पैसे कपाळाला लावून
पेटीत ठेवतांना
काहीतरी पुटपुटला .....
कदाचित्
“धंद्यात बरकत दे रे देवा”
किंवा, असंच काहीतरी.
............
याच्या धंद्यात बरकत म्हणजे,
कुणीतरी मरायला हवं .....
तिथे चिता जळणार,
याच्या घरात चूल पेटणार,
उदराग्नी शांत होणार.
याचं जीवन,
दुसर्‍याच्या मरणाधीन
अर्थशास्त्र,
दुसर्‍याच्या जीवावर बेतलेलं
...........
एकीकडे खड्डा,
दुसरीकडे मातीचा ढीग,
लयातून उत्पत्ती ....
उत्पत्ती, स्थिती, लयाच्या लयीत
गरगरणारं विचारचक्र ....
त्या मंथनातून,
पुनश्च गवसलेलं
शाश्वत, चिरंतन सत्य ......
’जीवो जीवस्य जीवनम्”
(माणसां-माणसांत देखील)
..... उल्हास भिडे (१५-११-२०१०)

Thursday, November 11, 2010

आज अचानक

आज अचानक

आज अचानक असे लाभला या गीताला सूर
आज अचानक कसा पालटे नियतीचाही नूर

गमे अचानक आज संपली हृदयातिल हुरहूर
किती दिसांनी शांत जाहले मनातले काहूर

गूज मनीचे तिज सांगाया आजवरी आतूर
प्रतिसादाच्या सुप्त भीतिने सदैव चिंतातूर

हृदयी वन्ही तरी न पसरे कधि शब्दांचा धूर
उतावीळ कंठाला ताकिद संयम, धीर, सबूर

आज अचानक तोडुन बंधन झाला कंठ फितूर
सुप्त गूज-बीजाला अवचित फुटले शब्दांकूर

सुन्न जाहलो, पुनश्च काहुर, सूर न हो बेसूर
मन वांछित प्रतिसादे काहुर ठरले क्षणभंगूर

“हो” म्हणतांना प्रिया जाहली सलज्जभावे चूर
स्वीकाराचे शब्द, शब्द ना रुणझुणला संतूर

क्षणी त्याच मज स्वर्ग भासला दोन अंगुळे दूर
हर्ष उसळला असा जणू की नाचे धुंद मयूर

प्रीतीगीता आज लाभले ताल नाद लय सूर
उभय अंतरी प्रीतचांदणे उजळे शुभ्र टिपूर

..... उल्हास भिडे (८-१०-२०१०)