Friday, September 10, 2010

जीवन सामान्याचे

जीवन सामान्याचे

अर्थहीन हे भासे मजला जीवन सामान्याचे
मनात काहुर काय प्रयोजन माझ्या अस्तित्वाचे

या असल्या वांझोट्या चिंता मेंदू कुरतडती
विचारांति त्या फोलच ठरती बघता अवती भवती

अगणित नगण्य अणु रेणू हे विश्वाचा आधार
पेशी पेशी मिळून देती जीवाला आकार

संगणकाचे Bit अन् Byte महाजाल निर्मिती
Mega Giga Tera Peta, Byteमधून फुलती

समान्यांतुन समाज घडतो असामान्य जाणिती
सामान्यां सन्मान्य मानुनी जीवन वेचीती

गोवर्धन उचलला हरीने सामान्यांसाठी
स्वराज्य तोरण शिवे बांधिले सामान्यांसाठी

क्रांतिवीर बलिवेदी चढले सामान्यांसाठी
सीमेवरती खडा पहारा सामान्यांसाठी

कलावंतही रसिकजनांना माय-बाप मानिती
भगवंताची भूक असे रे भक्तांची भक्ती

कळस राउळी सोन्याचा परि पाया पाषाणाचा
अदृश्य अशा आदेशे निश्चित हेतू अस्तित्वाचा

सामान्यांचे महत्त्व जगती सामान्यें जाणावे
सामान्य म्हणूनी कधी स्वत:ला उगा न हिणवावे

आयुष्या वरदान मानुनी जीवन घडवावे
कविश्रेष्ठांसम “जगण्यावरती शतदा प्रेम करावे”

...... उल्हास भिडे (१०-९-२०१०)

2 comments:

  1. एकदम "असामान्य" कामगिरीच की काका.
    आपण स्वतःला कधीही "सामान्य" या न्यूनगंडात ठेवता कामा नये हे फार बहारीने मांडले आहे. तुमच्या कविता वैविध्याबद्दल खूप आश्चर्य वाटते.

    ReplyDelete
  2. धन्यवाद शशांक

    ReplyDelete