Sunday, January 22, 2012

द्वैत

द्वैत

पानांच्या गर्दीतून वाट काढत
दाट सावलीखालच्या मउशार मातीवर उतरून
माझ्या अवतीभोवती विसावलेले उबदार कवडसे,
शेजारीच खळाळणार्‍या निरागस झर्‍यावर
सांडलेला सोनेरी वर्ख,
मधुनच एखाद्या रानफुलाला
‘भोज्जा’ करत बागडणारी गोड फुलपाखरं,
कुठल्याशा पक्ष्याने
प्रियेला घातलेली सु्रेल साद,
टेकड्यांच्या पिलावळीसहित
दूरवर ठाण मांडून बसलेले डोंगर,
मंद झुळुकेला लयीत दाद देणारं
माळावरचं हिरवंगार गवत,
स्वच्छ निळ्या आकाशात रेंगाळाणारा
एखाद-दुसराच चुकार ढग…...
…….. मोहक, सुंदर, विलोभनीय इ. शब्द
फिके पडावेत असं ते दृष्य,
विधात्याने रेखाटलेलं अप्रतीम चित्र.....

मंत्रमुग्ध होता होता वाटलं......
इथेच संपून जावं, माझ्यातलं 'मी'पण,
विलीन होऊन जावं या सगळ्यात,
साधलं जावं अद्वैत……….
पण…..पण, मी ’मी’च राहिलो नाही
तर वाटेल का या सार्‍याचं अप्रूप ?
उपभोगता येईल का हा अमूल्य आनंद ?.....
साखरेला चाखता येते का, स्वत:चीच गोडी !!
सुरेल गळ्याला लाभते का, रसिक कानांची तृप्ती !!!
……………
…… ह्म्म्म्म .....
अद्वैताच्या अंबरातून
द्वैताच्या जमिनीवर अलगद उतरत
एक छानसा आळस देत उठलो तिथून
नि घराच्या वाटेकडे परतताना
चार पावलांनंतर मागे वळून पाहिलं….
...... विधात्याचं ते निसर्गचित्रं
शतपटीने सुंदर भासलं.

.... उल्हास भिडे(२०-१-२०१२)No comments:

Post a Comment