Saturday, July 18, 2009

तनिष्काचे मनोगत (असंभव)तनिष्काचे मनोगत
असंभव communities वर ७-६-२००९ रोजी post केले होते
तनिष्काचे मनोगत
होते मी तर भरकटलेली
आत्म प्रौढितच गुरफटलेली
अगम्यतेचा कोष विणूनी
गेले होते त्यात गुंतुनी
कोषातिल त्या गूढ़ तमी मी कृष्ण रक्त रंगात रंगले
तरल भावना इंद्रधनुच्या रंगसप्तका मी त्याजियले
बंद दरवाजे उघडणे हाच माझा छंद होता
ना जगाची फिकिर होती विश्व माझे कोष होता

अवचित एक दिनी कोषाच्या अभेद्य भिंती थरथरल्या
आर्त साद ती पड़ता कानी सुप्त भावना जागृत झाल्या
आणि मग मी मलाच पुसले या सर्वातुन काय साधले
माता असुनी, अपत्य माझे का ममतेला वंचित झाले
दिव्य शक्तिच्या ध्यासापोटी आप्तजनां का मी अव्हेरले
गूढ़त्वाच्या राहु केतु नी मम मति इंदु कसे ग्रासले ?

विचारांति मग कोष भेदुनी मुक्त मोकळा श्वास घेतला
आणि तशातच जणु मंगलमय परिसस्पर्श तो मनास झाला
सांप्रत जन्मी पुनर्जन्म हा कल्पनेतही जरी असंभव
कर्मयोगी-सत्संगे नकळत माझ्या ठायी होई संभव
प्रेमभावना, वत्सलता अन् ममत्व मनि ते पुन्हा जागले
शुष्क काष्ठ ते आयुष्याचे अपत्य प्रेमे पुन्हा बहरले

अपत्य प्रेमे विचलित होता हित शत्रूने डाव साधला
माझ्याच करीचे शस्त्र घेउनी वर्मी माझ्या घाव घातला
जायबंदी मी, अविचल तरि मी
खंबीर मी, मी संयमी
अटल मी, ढृढ़ निश्चयी मी
घायाळ तरिही अचल मी
जरी आजवरि शक्ती माझी वापरली संहार सहाय्या
त्याच शक्तिचा प्रयोग आता करेन मी स्वजनां रक्षाया
सशक्त मी, समर्थ मी
सक्षम मी, स्थिर बुद्धि मी
पूर्ण शक्तिने अन् बुद्धीने
लढेन मी, झुंजेन मीNo comments:

Post a Comment